Tuesday, January 20, 2009

बराक ओबामांची प्रेम कहाणी...

प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडतोच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा यातून सुटलेले नाहीत. मिशेलची अन्‌ ओबामांची पहिली भेट झाली ती १९८८ साली. मिशेल या ओबामांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. सुरवातील ओबामा पत्नीला दुरवरूनच न्याहाळत. पण विचारण्याचे धाडस कधी होत नव्हते. पण एकदा ओबामांनी घाबरतच मिशेल यांना विचारले व संपुर्ण दिवस बरोबर घालविला. आणि ओबामांनी आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडली व पुढे दोघेही विवाहाच्या बंधनात अडकले. अगदी थोडक्‍यात ओबामांची ही प्रेम कहाणी. आज हेच ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांना सुद्धा संगर्ष करायला लागला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टी साठी मेहनत हवीच.

Monday, January 19, 2009

मी आलो तेंव्हा वेळ निघून गेली होती...

आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये होतो. व ती माझ्यापेक्षा वयाने पण मोठी होती. पण मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते समजलेच नाही. हळूहळू आमची प्रेम फूलू लागले. तशी ती खूप लाजाळू, घाबरट. आम्ही प्रत्यक्षापेक्षा इंटरकॉमवरच जास्त बोलायचो. ऑफीसच्या बाहेर कधी भेटसुद्धा होत नव्हती. आमच्या काळात मोबाईल नसल्याने "एसएमएस'चा प्रकारच नव्हता. पण दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्याची आतुरता असे. चार वर्षे आमचे प्रेम प्रकरण सुरू होते. खूप एकमेकांना समजून घेयाचो म्हणण्यापेक्षा तीच मला खूप समजावून घेयाची. कधी रागावत नसे, कुठला हट्ट नसे. खरच अशी मैत्रीणीचे प्रेम मिळाले हेच मी माझे भाग्य समजतो. परंतु घडणाऱ्या गोष्टी घडत राहतात. आणि जे नशिबात असते तेच होत असते. आणि आमच्या बाबतीतही हेच घडले. मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन मित्रांबरोबर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी "ट्रीप'ला गेलो होतो. व मी सुट्टी घेतल्याने तीने सुद्धा सुट्टी घेण्याचे ठरविले. कारण मी जर ऑफिसमध्ये नसलो तर तीला मुळीच करमत नसे. आणि हीच सुट्टी आम्हा दोघांना वेदना देवून गेली. आणि तिथेच सगळे संपले.... नेमके "त्या'काळात फोन आणि मोबाईलची सुविधा नसल्याने सुट्टीत आमचा संपर्क होऊ शकला नाही. आणि... आणि.... तिच्या घरच्यांनी तिचा विवाह निश्‍चित केला. तिचे म्हणणे घरातील कोणीही ऐकून घेतले नाही. तिला शब्द मांडण्याची एक संधी सुद्धा दिली नाही. मी ट्रिपवरून येताना तिच्यासाठी किती वस्तू आणल्या होत्या. तिच्या घरी फोन करण्याची सोय नसल्यामुळे ऑफीसमध्ये जाऊन कधी भेटेल असे झाले होते. तिला ऑफिसमध्ये किती आतुरतेने फोन केला. किती दिवसांनी तिचा आवाज ऐकणार होतो. तिला भेट वस्तू देणार होतो. बाहेरूनच तिला फोन केला. मी शहरात आलोय सांगण्यासाठी. फोन केला....समोरून आवाज हॅलो... माझे नाव सांगितल्याबरोबर तिकडून रडका आवाज... काय झाले समजायला मला मार्ग नव्हता. माझे काही चुकले का म्हणून मी सॉरी बोललो, की खूप दिवस भेटलो नाही म्हणून रागावलीस तु, पण रडणे काही थांबत नव्हते. फोनवरून तिने सर्व काही सांगितले. मित्रांनो तुम्ही विचार करा... माझी काय अवस्था झाली असेल. सर्व वस्तू तोडून-फोडून टाकल्या. जगावे की मरावे काही समजत नव्हते. आफिसला जाऊशी वाटत नव्हते. पण जे नशिबात असते तेच होत असते....
आजही मला तुझी खूप खूप आठवण येतेय.....

- एस.

मित्र आणि मैत्रीणींनो...

नमस्कार,
आपण या ब्लॉगला मेल पाठवून दिलेल्या प्रतिसादाबद्दल या ब्लॉगच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. खरोखरच आपण अपेक्षापेक्षाही जास्त प्रतिसाद दिला आहे. आपण पाठविलेले आपले मैत्रीचे-प्रेमाचे अनुभव नक्कीच या ब्लॉगवर प्रकाशित केले जातील. सर्व अनुभव एकदम प्रकाशित न करता, एक-एक प्रकाशित केला जाईल, तरी कृपया सहकार्य करावे, ही विनंती.

धन्यवाद!

Saturday, January 17, 2009

नकळत तो बदलला...

आम्ही एकदम जिग्गाड. लय भारी मित्र. एकदम जानी दोस्त. इ ५वी पासून एकत्र. असा दिवसच नसे की आम्ही भेटलो नाही. तो तसा वर्गात सगळ्यात हुशार. स्मार्ट हुशार. अभ्यसु हुशार नव्हे. आम्ही एकमेकांचे क्रश प्रेम कहाण्या सगळे सगळे शेअर केले. एकत्र खेळण्या बागडण्यात शाळेचे दिवस कसे संपले कळल नाही.

पुढे तो डेंटल कॉलेज ला लागला, मी इंजिनिअरिंग ला एकाच शहरात. त्यामुळे आमची मैत्री अबाधित होती. आणि होते तेच झाले. त्याला मैत्रीण मिळाली. जग पालटले. तो बदल्ला असे नव्हे. त्याच्या नकळत तो बदलला. सगळ्यात करिअरिस्टिक ऍबिशिअस मुलाचा चोथा झाला. हुशार असूनही फक्त तिच्या मुळे याने पिजी केली नाही. आता क्लिनिक मध्ये दातांचे काम करतो. एवढ्या हुशार मुलासाठी हे काम नव्हतं असं वाटत राहतं. शिवाय तिच्या सोबत राहून राहून फारच बाष्कळ बड्बड करायला शिकला. सारखे सारखे वाद घालू लागला. अजूनही आमची मैत्री आहे पण शेअरिंग थांबलं आहे सगळं. फोन केला की काय करतोस, काय चाल्लंय या पलीकडे बोलणं होत नाही. आता काय करणार. सगळं संपलं. उरलेत फक्त मैत्रीचे पोकळ वासे. त्यातलं आपले पण केव्हाच निघून गेलंय.

- अभिजीत

Friday, January 16, 2009

मित्र आणि मैत्रीणींनो...

मित्रांनो,
प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रीण येतच असते. परंतु ही मैत्री कधी-कधी निम्यातच संपते तर कांही मात्र शेवटपर्यंत निभावत असतात. प्रत्येकाला मैत्रीचे-प्रेमाचे अनुभव वेगवेगवळे येत असतात. परंतु खूप वेळा असे होते की, आपल्याला आपले मन मोकळे करायला मिळत नाही. आणि आपल्या मनात काय आहे, हे समोरच्याला समजत नाही. म्हणूनच आपले मन मोकळे करण्यासाठी, आपल्या मनात काय चालले आहे, हे समोरच्या व्यक्तीला समजण्यासाठी या ब्लॉगची सुरूवात करण्यात आली आहे. हे व्यासपीठ सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. आपले अनुभव या ब्लॉगवर प्रसिद्ध करायला नक्कीच आवडेल. तर आपण आपले अनुभव नक्की लिहा. परंतु अट एकच असणार आहे. खरे नाव कोणाचेही प्रकाशित केले जाणार नाही. फक्त पहिले नाव देण्यात येईल. (उदा. गोपाल) यामागे कारण म्हणजे या ब्लॉगमुळे कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ही इच्छा आहे. तर तुमच्या मैत्रीबद्दल-प्रेमाबद्दल जरूर मेल करा.
Email - sweetmaitrin@gmail.com

धन्यवाद !

Wednesday, January 14, 2009

योगायोग...

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो...
खूप दिवसांपासून मैत्रीणींवर ब्लॉग लिहिण्याची इच्छा होती. परंतु योग येत नव्हता. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीणी येत असतात. काहीचें मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते, तर काही जण छान मैत्री आयुष्यभर टिकवतात. तर काहींच्या नशिबात मैत्री टिकत नसते. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. तसाच माझाही वेगवेगळ्या मैत्रीणींबाबत अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमचे ही अनुभव पाठवत राहा. आपण सर्वजण मैत्री या विषयावर लिहीत जाऊ.

काही गोष्टी कशा "योगायोगाने' घडत असतात ना?काल ही अशीच घटना घडली मैत्रीणीबाबत... आम्ही दोघे शेजारी-शेजारी राहणारे खूप चांगली मैत्रीण. परंतु काही कारणामुळे लग्न होऊ शकले नाही. तीचे सुद्धा लग्न झाले आणि मी ही दुसऱ्या ठिकाणी राहावयास गेल्यामुळे भेट होत नव्हती.परंतु, काल योगायोगाने काही कामानिमित्त जुन्या ठिकाणी जाण्याचा योग आला होता. आणि खूप वेळ थांबावे लागणार होते त्यामुळे घरी तशी कल्पाना दिली होती.जुन्या ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणी जागृत झाल्या होत्या. इतरांशी बोलत असतानाही मन कशात लागत नव्हते. किती वर्षे आम्ही एकत्र घालवले होते. किती-किती गप्पा मारल्या होत्या. सगळा भूतकाळ आठवत होता. पण आज ती माझ्या बरोबर नव्हती. लग्न होऊन दूर गेल्यामुळे आज भेट होईल याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. परंतु योगायोग म्हणा नाहीतर काही म्हणा परंतु ती अचानक समोर आली. खूप वर्षांनी दिसल्यामुळे मी तर पहिल्यांदा ओळखले सुद्धा नव्हते. परंतु तीने गोड हासून "हाय' केले. काळजात एकदम धस्स झाले. ती आज भेटेल म्हणून वाटले सुद्धा नव्हते. परंतु खूप-खूप आनंद झाला. तिने बाजूला येण्याचा इशारा दिला. मी ही थोडे काम असल्याचे सांगून बाजूला गेलो.किती वर्षांनी दोघेच एकत्र आलो होतो. पण दोघात एक सिमारेषा होती. दोघांचे ही लग्न झाले होते. खूप-खूप दोघांच्या संसाराच्या, मुलांच्या गप्पा मारल्या. दीड तास गप्पा मारत होतो. आज पण पाहा ना, ती सुद्धा एकटीच आली होती आणि मी सुद्धा. जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. तु सुखी आहेस का? या प्रश्‍नावर मात्र तिच्या डोळ्यातून आश्रू आले. बंधनांमुळे मात्र मी ते आश्रू पुसू शकत नव्हतो. तशी ती सुद्धा संसारात खूप सुखात होती. परंतु जुन्या गोष्टी आठवत गेलो आणि मन भुतकाळात अक्षरशः बुडून गेले. आज किती वर्षांनी किती-किती गप्पा मारल्या ना आपण? किती छान वाटले ना? आपली भेट होईल असे वाटले सुद्धा नव्हते, असे अनेक प्रश्‍न सुरू असताना खिशातील मोबाईल वाजला. मोबाईल पाहतो तर घरून फोन होतो. मी रिसिव्ह केला.हॅलो... पुढचा आवाज होता.... पप्पा लवकर घरी या ना, मला तुमच्या बरोबर खेळायचे आहे. मनाला एकदम झटका बसल्यासारखे झाले. पुढचा आवाज होता बायकोचा... आजून किती वेळ लागणार आहे.... मी तुमच्यासाठी जेवणाचे थांबले आहे.....कशी वेळ येतेना, एकीकडे खूप वर्षांनी भेटलेली मैत्रीण तर दुसरीकडे घर... मैत्रीणीने ओळखून घेतले. प्लीज लवकर घरी जा. परत नक्की भेटू... तसाच पुढे निघालो.... पाठीमागे एकदा वळून पाहिले ती तशीच जागेवर उभी होती. मला परत मागे वळून पाहणे शक्‍यच नव्हते....मित्रांणो, कसा "योगायोग' असतो ना, प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण येत असतेच. प्रेम सुद्धा कसे असते ना?, तुमच्या सुद्धा खूप आठवणी असतीलच. तुम्ही सुद्धा त्या ब्लागच्या माध्यमातून "शेअर' करा...